
नवी दिल्लीः देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील कंझावला प्रकरणात गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली (Kanjhawala case in Delhi) आहे. या प्रकरणात तब्बल ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेले पोलिस कर्मचारी रोहिणी जिल्ह्यातील असून त्यात दोन पोलिस उपनिरीक्षक तर चार सहायक उपनिरीक्षकांचा तसेच पाच शिपायांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ३१ डिसेंबरच्या रात्री दिल्लीच्या कंझावाला परिसरात एका स्कुटीचालक तरुणीला कारची धडक बसली व त्यानंतर तिला तब्बल १३ किलोमीटर फरफटत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. फरफटत नेल्याने तिच्या शरीराची अत्यंत भयावह अवस्था झाली होती.
या प्रकरणात विशेष आयुक्त शालिनी सिंह यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अपघात घडला त्या रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
1 जानेवारीच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे अवयव फरफटत नेल्याने तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगाने कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १३ किमीपर्यंत फरफटत नेले व त्यात तिचा मृत्यू झाला. धडक दिल्यावर संबंधित युवती वाहनाला अडकली असल्याचे तरुणांच्या लक्षात आले होते. मात्र, तरीही पकडलो जाण्याच्या भीतीतून तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करीत कार पुढे दामटली.
1,150 total views, 3 views today