
नागपूरः नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांची (NCP Leader Satish Itkelwar) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी आदेश देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही इटकेलवार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते, हे विशेष. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या पाठिशी उभी असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर् पेठे यांनी जाहीर केले आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. मात्र, त्यामुळे नागपुरात काँग्रसमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला होता.
राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73
3,029 total views, 3 views today