
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या (Nagpur Division Teachers Constituency) निवडणुकीत कॉग्रेसचे समर्थन नेमके कोणाला? याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. यासंदर्भात अद्याप पक्षाचा निर्णय झालेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले तर काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केलाय तर आमदार सुनील केदार यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. त्यामुळे घोळ निर्माण झाला आहे. काँग्रेसचाच निर्णय होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा गोंधळाचे वातावरण असून ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सामना भाजप समर्थित नागो गाणार यांच्याशी होणार आहे.
उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटूनही काँग्रेसला या मतदारसंघात निर्णय घेता आला नाही. सुरुवातीला काँग्रेसने सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले गेले. मात्र, आता पक्षाने अद्याप कुठलाच निर्णय घेतला नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार यांनी वडेट्टीवार यांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीला पाठिंबा देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्ती पक्षाने करावी, असे आवाहन आशीष देशमुख यांनी केले आहे.
503 total views, 6 views today