
pm narendra modi
नवी दिल्ली (new delhi) : जो संकल्प करतो तोच इतिहास रचतो, त्यामुळे आपल्या राष्ट्राला अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करावे, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज दिला. (bjp) भारतीय जनता पार्टीची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्ली येथे संपन्न झाली. समारोप मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाने झाला. पंतप्रधानांनी आपल्या उदबोधनात सांगितलेल्या बाबींची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी पत्रकारांना दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे भाषण हे प्रेरक, दिशादर्शक आणि नवी वाट दाखविणारे होते. त्यांनी सांगितले की, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा भारताच्या विकासगाथेसाठी समर्पित केला पाहिजे. या अमृत काळाला कर्तव्य काळात परावर्तित करुनच देशाची प्रगती आपण साधू शकतो. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून द्यायला हवे. मा. पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून काही कार्यक्रम सुद्धा आगामी काळासाठी आखून दिले आहेत. देशातील सीमावर्ती भागात विविध आघाड्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजे. सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. विशेषत: आकांक्षित जिल्ह्यांत सुद्धा या योजना गतीने पोहोचल्या पाहिजे. याशिवाय प्रत्येक राज्यांनी सुद्धा एकमेकांशी समन्वय वाढवून भावनात्मकरित्या जोडले गेले पाहिजे. भाषा, संस्कृतीचा स्वीकार व्हावा आणि यातून एक भारत-श्रेष्ठ भारत साकारावे, असे आवाहन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ज्याप्रमाणे आपण ‘बेटी बचाओ’ अभियान यशस्वी केले, तसेच ‘धरती बचाओ’ अभियान सुद्धा राबविले जावे आणि त्यातून वसुंधरा रक्षणासाठी नैसर्गिक शेतीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासारखे विविध कार्यक्रम हाती घेऊन मिशन म्हणून यावर काम करावे, असेही आवाहन पंतप्रधानांनी केले. 18 ते 25 या वयोगटातील तरुणांनी भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहिला नाही. त्यामुळे गेल्या सरकारांनी केलेला भ्रष्टाचार आणि चुकीची कृत्ये त्यांना ठावूक नाहीत. त्यांच्यात जनजागरण करणे, लोकशाही मूल्यांशी आणि सुशासनाची त्यांना जोडण्याचे काम केले पाहिजे. हे सारे करीत असताना मतांची चिंता करू नका. देश आणि समाज बदलणे हे आपले कर्तव्य आहे. सामाजिक मिशन म्हणून हे काम करायचे आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचे संमेलन प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करा, अशी सुद्धा सूचना पंतप्रधानांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हे भाषण राजकीय नेते म्हणून नाही तर देश भक्कम करण्यासाठी काय करता येईल, यावर समग्र चिंतन करणारे होते. या अमृत काळाला विकास काळात परावर्तित करण्यासाठी भाजपा आपली संपूर्ण ताकद लावेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले
422 total views, 3 views today