
नागपूर (nagpur) : नायलॉन मांजाच्या (Nylon Manja ) दुष्परिणामांची कल्पना असतानाही पतंगप्रेमींनी नायलॉन मांजासह पतंग उडविण्याचा मोह सोडला नाही. या उत्सवात संक्रांतीच्या दिवसापासून पक्षी जखमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली. पतंगबाजीत मांजा मोठ्या प्रमाणात झाडांवरपण राहतो. अशा झाडांवर घरटे असलेल्या पक्षांचे जीवन त्यामुळे धोक्यात आले असून, ही संख्या सतत वाढत आहे. बुधवारी अजनी चौक परिसरात नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या एका वट वाघुळाची पशु प्रेमींनी सुटका केली.
प्राप्त माहितीनुसार, अजनी चौकात गोपाळ चोपडे (Gopal Chopde) या युवकाला त्याच्या दुचाकीवर एक मोठा बॅट, म्हणजेच वटवाघूळ नायलॉन मांजात अडकून पडलेला दिसला. त्याच्या पंखातून रक्त वाहत होते आणि त्याला वेदना देखील होत होत्या. या वटवाघुळाची मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सफल न झाल्याने गोपाळ चोपडे यांनी पशुप्रेमी नीलेश रामटेके आणि सोनू मंडपे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अत्यंत सावधपणे पंखातून मांजा काढून जखमी बॅटची सुटका केली. या वटवाघुळासाठी फळांची व्यवस्था करून त्याला उपचारासाठी वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी झाडे, विद्युत खांब, इमारतींवर नायलॉन मांजा लटकलेला दिसतो आहे. त्यामुळे पक्षांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने मांजा हटवणे गरजेचे झाले आहे. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, उद्यान अधीक्षक, महाराष्ट्र प्राणी कल्याणकारी मंडळ, महानगरपालिका झोन अधीक्षकांना मांजा हटविण्याची मोहीम राबविण्याची विनंती पशु प्रेमींकडून केली जात आहे
450 total views, 3 views today