
मुंबईः अखेर नागपूर आणि नाशिकसह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत याबाबत घोषणा केली असून नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने पाठिंबा दिलाय. तर नाशिक पदवीधर म्हणजे शिवसेनेच्या शुभांगी पाटील मविआच्या उमेदवार राहतील, असे त्यांनी सांगितले. अमरावती विभागात धिरज लिंगाडे, औरंगाबदमध्ये विक्रम काळे आणि कोकणात बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा त्यांनी केली. महाविकास आघाडी या पाचही जागा जिकेंल, असा दावाही पटोलेंनी यावेळी केला. मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून उमेदवारांबाबत घोळ सुरु होता. तो दूर होऊन अखेर काँग्रेसने नागपुरात सुधाकर अडबाले यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे ठरतील, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. जगात सर्वात मोठा पक्ष असल्याचा गवगवा करणाऱ्या भाजपाला नाशिकमध्ये उमेदवार मिळाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात (Nagpur Division Teachers Constituency) नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबतचा काँग्रेसचा निर्णय होत नव्हता. बुधवारी रात्री काँग्रेसच्या बैठकीनंतर नावाची घोषणा झालेली नव्हती. यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांमधील मतभेद मात्र चव्हाट्यावर आले आहेत. काही नेत्यांनी परस्पर वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याचा प्रकारही यानिमित्ताने घडला आहे. उमेदवारास समर्थन जाहीर करण्याचा अधिकार सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या नेत्यांना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करून माजी आमदार आशिष देशमुख यांनी आपला पाठिंबा शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना असल्याचे जाहीर केले आहे. सुरुवातीला नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले होते. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर दबाव टाकून शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यायला लावली. काँग्रेसने नाशिकची जागा शिवसेनेसाठी सोडली त्या बदल्यात नागपूरची जागा मागून घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अडबाले यांना समर्थन जाहीर करावे यासाठी आग्रह धरला आहे. दुसरीकडे शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील हे दोन दिवस विदर्भात तळ ठोकून होते. पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे झाडे यांना समर्थन जाहीर करावे, यासाठी त्यांनी अनेक नेत्यांसोबत चर्चा केली. मात्र त्यांना काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी केदार आणि वडेट्टीवार यांनी परस्पर अडबाले यांना समर्थन जाहीर केल्याने कपिल पाटील नाराज होऊन निघून गेल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
562 total views, 3 views today