
वर्धाः वर्धा येथे सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी (Slogans for Separate Vidarbha State) केली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले व त्यांचे भाषण सुरू असतानाच काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा सुरु केल्या. त्यामुळे मंडपात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात विदर्भवाद्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारची दारे चोवीस तास उघडी असून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ असे सांगितले. वर्धा येथील महात्मा गांधी साहित्यनगरीत शुक्रवारपासून मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या घोषणा देताना विदर्भवाद्यांनी विदर्भावर उर्जा, पाणी, निधी अशा प्रत्येक गोष्टीत अन्याय होत असल्याचा आरोप केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरुच होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार असून आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे चोवीस तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, वर्धा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या सभामंडपाबाहेर देखील काही महिलांनी देखील घोषणाबाजी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आंदोलनकर्त्या महिला आम्हाला बोलू द्या, कुणीतरी आमचे ऐका, आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जा, पण विदर्भ वेगळा करुन द्या, अशी मागणी करीत होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून या महिलांना दूर सारले.
4,190 total views, 3 views today