नवी दिल्ली: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने आता चीनला मागे टाकले आहे. 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी यापूर्वीच वर्तविला होता. मात्र, आता संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या निधीने (UNFPA) ताजी आकडेवारी जाहीर करून या अंदाजाला पुष्टी दिली आहे. (India Overtake China in Population) भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 20 लाखाने अधिक आहे. देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. चीनमधील जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरल्याने तेथील लोकसंख्या वाढ बरीच आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे.
1,428.6 दशलक्ष लोकसंख्या
संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या निधीचा (UNFPA) हा अहवाल ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष इतकीआहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष दाखविण्यात आली आहे. 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तरुण लोकसंख्या
दरम्यान, लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आला असला तरी जमेची बाजू म्हणजे सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतात आहे. भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0-14 वयोगटातील, 18 टक्के लोकसंख्या 10-19 वयोगटातील, 26 टक्के लोकसंख्या 10-24 वयोगटातील, 68 टक्के लोकसंख्या 15-64 वर्षे वयोगटातील असल्याचे हा अहवाल सांगतो. तर चीनमध्ये 65 वर्षांवरील लोकांची संख्या 20 कोटी इतकी आहे.