

भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?
भारतात सर्वप्रथम 1 मे 1923 रोजी चेन्नई येथे कामगार दिन साजरा करण्यात आला होता. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या सभेला कामगारांवरील अत्याचार आणि शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक संघटना आणि सामाजिक पक्षांचा पाठिंबा मिळाला. कामगारांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारतात दरवर्षी १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. कामगार दिनी भारतात सार्वजनिक सुट्टी देखील असते.कामगार दिनामागचा इतिहास – History Behind International Labour Day
कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितानिमित्त झालेल्या एका चळवळीतून झाली. १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरूवात झाली. ज्यात कामगारांच्या हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी केली होती. दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी होती. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका, कॅनडामधील कामगार संघटनांनी पुढाकार घेत १९८६ मध्ये कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. अशाच एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉंम्ब टाकला आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. याची शिक्षा म्हणून आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉंम्ब फेकलेला नव्हता. या रक्तरंजित इतिहासानंतर या आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. १९९० ला कामगारांची ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १९८९ साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे १८९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व – Significance Of International Labour Day
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा का केला जातो याविषयी काही महत्त्वाची माहिती- हा दिवस कामगारांच्या हितानिमित्त केल्या गेलेल्या त्या चळवळीचे प्रतिक आहे. ज्यामध्ये कामगारांनी दिवसाचे कामाचे तास आठ असावेत अशी प्रमुख मागणी केली होती. कारण त्यापूर्वी कामगारांना दिवसभरात पंधरापेक्षा जास्त तास काम करावे लागत असे. पुढे लोक या चळवळीला आठ तासांची चळवळ म्हणूनही ओळखू लागले.
- या चळवळीत कामगारांच्या कामाच्या तासांसोबतच त्यांना कामाच्या बदल्यात मिळण्याऱ्या वागणूक आणि मोबदल्या विषयीही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या होत्या. शिकागो आंदोलनानंतर कामगारांना आठ तासांचे काम, योग्य मोबदला, चांगली वागणूक, पगारी सुट्टी मिळू लागली.
- निरनिराळ्या समाजवादी, साम्यवादी आणि अराजकवादी गटांनी केलेल्या निर्दशनासाठी १ मे हा दिवस ओळखला जातो.
- युरोपमध्ये पूर्वीपासून १ मे हा दिवस वसंत उत्सव म्हणूनही साजरा केला जात असे. पुढे या आंदोलनामुळे युरोपमध्ये ही हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला.
- १९०४ साली अॅम्स्टरडॅम येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत संपूर्ण जगभरातील कामगार संघटनांना १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं होतं.
- आजही अनेक प्रमुख देशांमध्ये १ मे निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. त्याचप्रमाणे या दिवसानिमित्त अनेक देशांमध्ये खास कार्यक्रम आणि सैन्याचे संचलन आयोजित केले जाते.
- भारतात लेबर किसान पार्टीने १ मे १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. त्यावेळी भारतात कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाचा झेंडा वापरण्यात आला होता.
- भारतात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो.
भारतातील कामगार कायदे – Labour Act In India
ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसे कमवणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार चळवळीनंतर कामगाराच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे. भारतीय कामगार कायदा म्हणजे भारतातील कामगारांचे नियम करणारा कायदा. भारतात कामगारांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. यात २०० राष्ट्रीय आणि ५० केंद्रिय कायद्यांचा समावेश आहे. भारतातील कामगार कायद्यांची व्याख्या एकसंध नाही. कारण सरकार स्थापना आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. मात्र भारतात यासंदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आले आहे. जो आहे “दी चाईल्ड लेबर अॅक्ट ऑफ 1986” थोडक्यात बालकामगार कायदा. लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. बऱ्याचदा लहान वयातच कष्टाची कामे करावी लागल्यामुळे अनेक लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या कायद्यानुसार भारतात चौदा वर्षांखाली बालकांना मजूरी अथवा काम करण्यास मनाई आहे. कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांचा मजूरीसाठी गैरवापर आणि छळवणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे.