

काय म्हणाले शरद पवार?
शिवसेनेतील असंतोषाचा उद्रेक शमवायला नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धवने राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला..”, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीत मांडले (Sharad Pawar Political Autobiography) आहे. मंगळवारी या सुधारित आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. “महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ठाकरे यांनी माघार घेतली. शारीरिक अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण असावे. करोनाच्या काळात राष्ट्रवादीचे सारे मंत्री मैदानात सक्रिय होते. उद्धव ठाकरे हे प्रशासनाच्या संपर्कात होते पण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वात मोठे आव्हान होते. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होती”, असेही पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. तो अंदाज नव्हता.. “आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा अंदाज आला नव्हता…” असे नमूद करून शरद पवार लिहितात की, “राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. उद्या काय होऊ शकते, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याबाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असले तरी ते टाळता आले असते..” असे पवार नमूद करतात.