नाशिक (NASHIK) : राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असेल. त्यात आमच्या सोळा आमदारांना अपात्र ठरविले गेले तरी इतिहास घडेल आणि अपात्र नाही केले तरी इतिहास घडेल, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Agriculture Minister Abdul Sattar). अब्दुल सत्तार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी एक नियम ठरणार आहे आणि त्यात आमची नावे असतील. त्यामुळे आम्ही अपात्र ठरलो तरी इतिहासच घडेल. पण खरी शिवसेना ही मुख्यमंत्री EKNATH Sएकनाथ शिंदे यांचीच राहील, असा दावाही सत्तार यांनी केला.
निवडणूक आयोगाने आमच्याकडील बहुमत पाहून आम्हाला शिवसेना पक्ष व चिन्ह दिले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, याची खात्री आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वासही आहे. महाविकास आघाडीची की वज्रमूठ ही तुटली असून काँग्रेसची भूमिका पाहिल्यास यापुढे या मुठीचे खूप तुकडे झाल्याचे दिसेल, असे ते म्हणाले.
रामप्रहरीचा भोंगा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रामप्रहरीचा भोंगा आहेत. तो रोज सकाळी आम्हाला शिव्या घालतात. मात्र ते खासदार आमच्या मतावर झाल्याचे विसरतात. याचा त्यांना विसर पडला आहे, असे सत्तार म्हणाले.
नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव
राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचे प्रस्ताव असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे सत्तार यांनी यावेळी सांगितले.