मुंबईः “शरद पवार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले (NCP State President Jayant Patil) आहे. जयंत पाटील यांचा रोख नेमका कोणावर होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका सभेत बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झाले होते. बरेच लोक देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे” असेही जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केले.
शिंदेनी चिंता करावी
दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणत आहेत. मात्र, त्यांच्या पुन्हा येईनची चिंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी”, असे जयंत पाटील म्हणाले. फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत जयंत पाटील म्हणाले, “त्यांची भीती आम्हाला नाही, तर त्यांची भीती एकनाथ शिंदे यांना असली पाहिजे. ते आलेलेच आहेत व दोन नंबरला बसलेले आहेत.”