मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी अलिकडेच केला आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर देताना महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, अशी स्पष्ट भूमिका (MPCC President Nana Patole) मांडली आहे. अलिकडेच पटोले यांनी कोणत्याही कारणामुळे महाविकास आघाडी न झाल्यास आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचे वक्तव्य देखील केले होते. काल पटोलेंनी प्लान-बी बाबत स्पष्टीकरण दिले.
पटोले यांनी सांगितले की, “विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंतची हीच परंपरा राहिलेली आहे. ही आतापर्यंतची लोकशाहीची परंपरा आहे. मात्र, ज्या पद्धतीने २०१४ मध्ये काँग्रेसला धोका मिळाला, त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. त्या धोक्यामुळे महाविकास आघाडीत गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील. ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल. मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल.”
ठाकरे गटावर नाराजी
दरम्यान, महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितले होते की, हे करू नका. पण तरी त्यांनी ते केले व स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे, असे पटोले म्हणाले.