वाशिंग्टन (Washington): हॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता व गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटात व्हिटो कॉरलियॉनची भूमिका साकारणारा रॉबर्ट डी निरो वयाच्या 79 व्या वर्षी सातव्या मुलाचा बाप झाला (Robert De Niro) आहे. स्वतः रॉबर्ट डी निरो ने याबाबत माहिती जाहीर केली. मात्र, त्याने आपल्या पत्नी किंवा मुलाबाबत इतर कुठलीही माहिती जाहीर केलेली नाही. या अभिनेत्याला त्याच्या सहा अपत्यांबद्धल विचारण्यात आले असता त्याने “सहा नाही सात…” असे सांगत, हा खुलासा केलाय.
रॉबर्ट डी निरो सध्या ‘अबाउट माय फादर’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. “मला मुलांसाठी नियम घालून देणे आवडत नाही. तथापि, इतर कुठलाही मार्ग नाही आणि कोणत्याही पालकांना नेमके हेच वाटत असावे”, असे तो सांगतो. “प्रत्येकाला आपल्या मुलांना नेहमीच योग्य मार्गावर न्यायचे असते. त्यांनी योग्य असेच करावे असेही त्यांना वाटते आणि त्यांचा फायदाही हवा असतो. पण कधी कधी असे घडत नाही” असेही तो सांगतो.