

अमळनेरमध्ये उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका अमळनेर येथील रुपाली राजपूत या महिलेला बसला असून उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत असून बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डाॅक्टरांसह प्रशासनाकडून केले जात आहे. रुपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. रेल्वेतून प्रवास करून त्या भर उन्हात आपल्या घरी आल्या. परंतु काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्रास वाढताच त्यांनी आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडून प्राथमिक उपचार करून घेतले. त्यानंतर काही वेळासाठी त्यांना बरंही वाटू लागले होते. मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला आणि त्यांची शुद्ध हरपली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचं शवविच्छेदन केलं असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. रुपाली राजपूत या जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत. याआधी एप्रिल महिन्यात पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग चव्हाण (३६) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.