बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिला तर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असून आम्हाला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सकाळी साडेअकरा वाजताच्या स्थितीनुसार कर्नाटकमध्ये २२४ पैकी काँग्रेसला १२४ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमतासह सहज सरकार बनवेल, असे सध्याचे संकेत आहेत. सत्तारूढ भाजप ७० जागांसह दुसऱ्या तर जेडीएस २३ जागांवर आघाडीवर आहे. ८ जागांवर अन्य उमेदवार आघाडी मिळवून आहेत. (Karnataka Assembly Election Results 2023) कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर देशातील हे चौथे राज्य असेल.
पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने हैदराबादेत एक रिसॉर्ट बुक केला आहे. पक्षाला बहुमतापेक्षा कमी जागा किंवा काठावरचे बहुमत मिळाले तर सर्वच नवनिर्वाचित आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवले जाईल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.