मुंबईः उद्धव ठाकरे कोणाचे ऐकतात वा कोणाचा सल्ला घेतात, हे माहिती नाही. त्यांना लोकांना भेटण्याची आणि सल्लामसलत करण्याची सवय नाही. ही सवय घातक आहे. म्हणून त्यांना कुणी सल्ला दिला नसावा, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Prithviraj Chavan) यांनी केली आहे. चव्हाण यांनी नाना पटोले यांच्या राजीनामा प्रकरणावरही भाष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज्यपातळीवर त्याची पूर्वकल्पना देणे किंवा चर्चा करणे अपेक्षित होतेच. ते अध्यक्षपदी राहिले असते तर १६ आमदारांवर त्याचवेळी अपात्रतेचा निर्णय कदाचित झाला असता. उद्धव ठाकरेंनी सल्लामसलतीने आघाडी सरकार चालवले असते तरी खूप फायदा झाला असता, असे मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
नाना पटोले व उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचले असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही राजीनामे अवेळी आणि चुकीचेच होते. उद्धव ठाकरे यांना संसदीय प्रथा व परंपरांची माहिती नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पटोले यांना संसदीय प्रथा व परंपरांची माहिती असतानाही त्यांनी दिल्लीतून कुणीतरी सांगितले म्हणून विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे चव्हाण म्हणाले. चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरे यांना संसदीय प्रथा, परंपरांची माहिती नव्हती. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परतल्यावर आम्ही त्यांना भेटलाे. विधान परिषदेत एकेक मत महत्त्वाचे असते, असे समजावून सांगितल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले.