नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस उलटून गेले तरी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झालेला (Karnataka Congress Political crisis) नाही. सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला असला तरी दुसरे दावेदार डीके शिवकुमार यांना हा निर्णय मान्य नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी पद नको, असे त्यांनी निक्षून सांगितले असल्याने आता त्यांचे मन वळविण्याची जवाबदारी प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली आहे. त्या सायंकाळी डिके यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे असल्याचे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले. आपण पक्षाला लोकसभेच्या 20 ते 22 जागा जिंकून देऊ, असा विश्वास त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलाय. या सर्व घडामोडींमध्ये बंगळुरूमध्ये तयारी थांबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेतृत्वाने आमदारांच्या भावना जाणून घेतल्या असता 80 हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने कौल दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन होईल.