नवी दिल्लीः चक्रीवादळ आणि अन्य कारणांमुळे मान्सूनपूर्व स्थिती कमकुवत झाल्याने मान्सूनचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला असतानाच आता भारतीय हवामान विभागाने (IMD on Monsoon Prediction) मात्र मान्सून केवळ तीन दिवस उशिरा म्हणजे ४ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजात तीन ते चार दिवसांचा फरक पडू शकतो, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाने मागील तीन वर्षात सरासरी पावसाचे अत्यंत अचूक अंदाज वर्तविलेले आहेत.
मान्सूनच्या आगमनाची तारीखही अचूक राहिलेली आहे. मागील १७ वर्षांच्या काळात आतापर्यंत केवळ एकदाच म्हणजे २०१५ मध्येच हवामान खात्याचा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज चुकला होता, असा विभागाचा दावा आहे.
हवामान विभागाच्या पाहणीनुसार मान्सूनपूर्व सागरी व जमिनीचा पृष्ठभागाच्या तापमानासह काही निवडक घटक मान्सूच्या आगमनाचे संकेत देत असतात. उष्णता सरासरीपेक्षा अधिक राहिल्यास ती मान्सूनला ओढण्यास मदत करते. यंदा मे महिन्यात पावसामुळे पृष्ठभागावर आर्द्रतेचे प्रमाण राहिले. मान्सूनच्या आगमनासाठी मातीचा पृष्ठभाग पुरेसा उष्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळेच मान्सूनचे दोन ते तीन दिवस उशिराने आगमन अपेक्षित आहे. यंदा पावसाचे प्रमाण सामान्य म्हणजे सरासरी ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचे भारतीय हवामान विभागाचे अंदाज आहेत.