मुंबई : आपल्याला अडकविण्यासाठीच राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा (Paramveer Singh Case) वापर केला व त्याचे बक्षिस म्हणून त्यांच्यावरीील निलंबनाची कारवाई सरकारने मागे घेतली, असा थेट आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Former HM Anil Deshmukh) यांनी केलाय. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना देशमुखांनी हा आरोप केला. अनिल देशमुख म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे, त्या सरकारनेच मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर केला. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा आपण उचलणार आहोत. या मुद्यावर आपण आणखी सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसचाही दावा
परमबीर सिंह यांना देशमुख यांच्या विरोधात वापरले गेले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केलाय. फडणवीस यांनी आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कट केला होता व त्यामुळेच सरकारने तांत्रिकदृष्ट्या कॅटच्या फेऱ्यातून परमबीर सिंह यांना बाहेर काढले, असेही पटोले म्हणाले. परमबीर सिंह यांच्याआधी देवेंद्र फडणवीसांनीच गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुखांच्या प्रकरणात 100 कोटींचा हिशोब शेवटपर्यंत लागलाच नाही. परमबीर सिंह यांच्या बाबतीत देण्यात आलेल्या आदेशात उच्च न्यायालय आणि कॅटच्या आदेशाचेही पालन करण्यात आले नाही, असा दावाही त्यांनी केलाय.