नागपूर : भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करणारा निरजसिंग राठोड याला नागपूर गुन्हे शाखा पोलीसांनी गुजरातमध्ये अटक करून अखेर नागपुरात आणले. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील सहा आमदारांकडे त्याने पैशाची मागणी केली होती. यात मध्य नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे,कामठीचे भाजप आ. टेकचंद सावरकर यांना त्याने फोन केला होता. याचप्रकारे या आरोपीने देशभरातील अनेक आमदारांकडे पैसे मागितल्याची माहिती आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील ४२० चा गुन्हा दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले. याशिवाय या आरोपीसोबत आणखी काही साथीदार असू शकतात तसेच आणखी काही काही आमदारांना त्याने फोन करून पैसे मागितल्याची शक्यता आहे, यामुळे पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांच्या चौकशीत अधिक माहिती पुढं येईल अशी माहिती मनोज शिडाम, एसीपी, गुन्हे शाखा यांनी दिली. आरोपी नीरज राठोड यास 22 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत.