बंगळुरु : कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवूनही काँग्रेसपुढील संकटं काही दूर होण्याचे नाव घेत नाही. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या घोषणेनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर हे नाराज झाले आहेत. आपल्याला संधी न मिळाल्याने दलित समाज दुखावला असून मी ५० आमदारांना सोबत घेऊन दाखवू शकतो, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला असल्याने काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. परमेश्वर म्हणाले की मला मुख्यमंत्री नाही तर किमान उपमुख्यमंत्री तरी बनवायला हवे होते. कर्नाटकमध्ये दलित मुख्यमंत्र्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. पण तसे झाले नाही. मी देखील सरकार चालवू शकतो, असा दावा त्यांनी केलाय.
आगामी काळात जी. परमेश्वर हे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 1989 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी तुमकूरला भेट दिली तेव्हा, परमेश्वर हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये सहसचिव म्हणून सामील झाले होते. जनतादल युनायटेड व काँग्रेस युतीच्या सरकारमध्ये परमेश्वर हे राज्याचे पहिले दलित उपमुख्यमंत्री होते. ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते.