

-पुरुषोत्तम आवारे पाटील
दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी चक्क मंत्रिपदाचा लिलाव लावणारा भामटा ताब्यात घेतला. आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा पीए असल्याचे सांगत या भामट्याने भाजपच्या चारपाच आमदारांना फोन लावून मंत्रिपद हवे असल्यास एवढी रक्कम द्यावी लागेल अशी ऑफर दिली. नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे याना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि पुढे हा भामटा पोलिसांनी जेरबंद केला. हा भामटा चक्क गुजरातचा भाजप कार्यकर्ता निघाला ,गुजरात मधील मोरबी येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एखाद्या पक्षाचे सरकार त्या राज्यात आले की त्या पक्षाचे आमदार मंत्री पदासाठी इच्छुक असणे स्वाभाविक आहे मात्र काही लोक स्वतःची लायकी नसताना त्या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात, हे पद सरळ मार्गाने मिळत नाही हे लक्षात आल्यावर आडमार्गाने खटपटी सुरु होतात. कुठेतरी पैसे भरले की मंत्रिपद हमखास मिळते याची त्यांना माहिती असते म्हणूनच अश्या ऑफर येतात. राजकारणात हायकमांडला पैसे द्यावे लागतात हे भारतीय राजकारणाला काही नवीन बाब नाही. ज्यांचे हायकमांड दिल्लीत बसतात त्यांना सतत दिल्लीच्या वाऱ्या सुद्धा कराव्या लागतात आणि त्यांचे मन सांभाळण्यासाठी सतत काहीतरी जाताना सोबत न्यावे लागते हे साधा कार्यकर्ताही बिनधास्तपणे सांगू शकेल एवढे ते ओपन सिक्रेट आहे. एखाद्या पक्षाचे सरकार आल्यावर काही दिवसात जनतेचे मंत्री मंडळाच्या गठन प्रक्रियेवर लक्ष लागते. त्यात काही नावे अशी अचानक पुढे येतात की ज्यांची कुणीही कल्पना सुद्धा केलेली नसते. कार्यकर्ते ,मतदार आणि समाजातील अनेक घटक अमुकची हमखास वर्णी लागते याची खात्री देत असताना एखादे असे नाव मंत्रिपदावर येते की ऐकणारे गपगार होऊन जातात अशावेळी मग पैश्यांची चर्चा व्हायला लागते. ज्याची वर्णी लागते त्याची आर्थिक आणि सामाजिक कुवत लोकांना माहित असते त्यामुळे इथे कुठेतरी पाणी मुरले आहे असा संशय लोक घेतात. ज्या अर्थी मंत्रिपदासाठी लोक कोट्यवधींची ऑफर देतात त्याअर्थी या पदांसाठी तेवढा किंवा त्यापेक्षा अधिक पैसा द्यावा लागत असेल हे नाकारता येत नाही. कोणत्याही मंत्री मंडळात काही लोक हमखास हायकमांडच्या तिजोरीत भर टाकून मंत्री झालेले असतात हे अलीकडे कुणीही नाकारीत नाही. राजकारण करण्यासाठी आणि पक्षाचे संघटन चालविण्यासाठी कोटींची उड्डाणे घ्यावी लागतात त्यामुळे राजकारण हा केवळ पैश्यांचा खेळ आहे यावर कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. बिगर पैश्याचे खरोखर कुणाच्या घरात मंत्रपद चालून आले असते तर खुद्द महाराष्ट्रात अनेक टर्म आमदार राहूनही आमदार म्हणूनच वर गेलेल्यांची संख्या नगण्य असती मात्र असे झाले नाही. ज्यांना विभागीय समतोल किंवा जाती प्रतिनिधित्व या नावाखाली मंत्रीपदे दिली जातात त्यांना पुढे किती आर्थिक ओझी उचलावी लागतात हे समजून घायचे असेल तर कोणत्याही माजी मंत्र्यांशी गप्पा मारा म्हणजे समजेल. मागे एका पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याला त्याच्या पक्षाच्या सुप्रिमोने स्वतःसाठी प्रचार दौऱ्यात हेलिकॉप्टरची मागणी केली ,मंत्र्यानेही साहेबानी प्रथमच मागणी केली म्हणून हेलिकॉप्टरचे तीन लाख भाडे आनंदाने भरले. नेत्याच्या लक्षात आले की मंत्री बराच कमावतो आहे ,मग काय पुढच्या काही दिवसात नेत्याकडून १५ दिवस हेलिकॉप्टर दौऱ्याची यादीच आली . अर्थात काहीही करून त्याला हा हवाई दौरा पूर्ण करावा लागला नंतर मात्र त्याने थेट साहेबांशी काडीमोड घेतला तेव्हा कुठे त्याचा जीव ” भांड्यात ” पडला. हे किस्से लहान पक्षांचे असतात मात्र मोठ्या पक्षांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या व्यथा आणि कामे सुद्धा तेवढीच मोठी असते हे नव्याने राजकीय क्षेत्रात तरी कुणाला सांगण्याची गरज नाही. मंत्री पदावर असे पर्यंत त्याचा दररोज होणारा लाखोंचा खर्च उचलणाऱ्या असंख्य लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. खासगी सचिवांकडे अश्या कंत्राटदारांची मोठी प्रतीक्षा यादी असते. ही सगळी किमया जर मंत्री पदाच्या माध्यमातून होत असेल तर त्यासाठी कोटींची उड्डाणे घ्यायला कुणीही तयार होईल म्हणून अश्या ऑफर येत असतात. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा बोगस पीए बनून या भामट्याने कदाचित फोन केलाही असेल मग खरे पीए यापेक्षा वेगळं काय करतात हे सुद्धा तपासून बघण्याची गरज आहे. अनेक मंत्र्यांचे पीए ,ओएसडी पूर्ण पाच वर्षांच्या काळात केवळ वसुली कामात व्यस्त असतात. अनेक मंत्र्यांनी स्वतःचे नातेवाईक किंवा विश्वासू व्यक्तींची त्यासाठी खास नेमणूक केलेली असते. एक राज्यमंत्री आपल्या काळात किमान एक हजार कोटींची संपत्ती कमावतो असे या क्षेत्रातील जाणकार लोक बॊलतात हे जर खरे असेल तर आपल्या देशात लोकांच्या घामाचा पैसा नेमका कुठे जातो हे समजते. सामान्य कार्यकर्ते जिंदाबाद,मुर्दाबादचे नारे लावताना स्वतःवर खटले दाखल करून घेतात आणि मंत्री,राज्यमंत्री कोट्यवधींची उड्डाणे घेत असतात हे वास्तव आहे.