नागपूर : क्रिकेटच्या सट्ट्याचे व्यसन किती घातक ठरु शकते, याचा प्रत्यय देणारी दुदैवी घटना नागपुरात छापरु नगर परिसरात उघडकीस आली (Mother-Son Commit Suicide) आहे. या घटनेमुळे एक कुटुंब उध्वस्त झालं आहे. सट्ट्यात नुकसान झाल्याच्या कारणापायी तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या आईने विष घेऊन मृत्यूला कवटाळले. खितेन वाधवानी (वय २०) आणि दिव्या नरेश वाधवानी (वय ५०) अशी या आत्महत्या करणाऱ्या मायलेकांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक खितेन नरेश वाघवानी याला सट्टा खेळण्याचे व्यजन जडले होते. तो रोजच सट्टा खेळायचा. शनिवारी खितेन मध्यरात्री उशिरा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला चांगलेच फैलावर घेतले. यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंब नातेवाईकांकडे लग्न समारंभात सहभागी गेले असताना घरी एकटाच असलेल्या खितेनने घरातील स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. परिवार घरी परतल्यावर त्यांनी खितेन फासावर लटकलेला आढळला. या घटनेचा त्याच्या आईच्या मनावर आघात झाला. या दरम्यान, दिव्या वाधवानी यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांनी विष घेतल्याचे लक्षात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. आपण रागावल्यामुळेच मुलाने आत्महत्या केल्याच्या भावनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. खितेन हा गपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. परंतु चुकीच्या संगतीला लागल्यामुळे तो क्रिकेट सट्ट्याकडे वळल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. गेल्यावर्षी त्याने आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला व त्यात त्याने बरेच पैसे गमावले होते. त्यामुळे त्याच्या वडीलांना आर्थिक फटका देखील बसला होता. मात्र, त्यापासून धडा न घेता यावर्षीही त्याने सट्ट्यावर पैसे लावले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. लकडगंज पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.