शिरडी: समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर या ८० किलो मीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरडीमध्ये पार पडले. दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. येत्या सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण महामार्ग सुरू करू व तिसरा टप्पा थेट मुंबईपर्यंत जाईल, असा विश्वास (Samruddhi Mahamarg) देवेंद्र फडणवीस यांनीी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, अनेकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरला सभा घेत महामार्ग होऊ देणार नाही व एकही इंच जमीन देणार नाही असे सांगतले होते. तर दुसरीकडे शरद पवारांनीही हे शक्य नाही व होऊ शकत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लोकांच्या भेटी घेतल्या. तेव्हा गावागावांतील लोकांनी जमीनी दिल्या. ७०१ किमीच्या संपूर्ण ग्रीनफिल्ड मार्गाची जमीन नऊ महिन्यात संपादीत करून दाखवली हा देशातील विक्रम असल्याचे फडणवीस म्हणाले. ग्रीन फिल्ड समृद्धी महामार्ग तयार करणे अनेक लोकांना स्वप्नवत वाटत होते. पण मला पूर्ण विश्वास होता तसा एकनाथ शिंदे यांनाही होता. मी आमदारांची बैठक घेतली. विरोधाच्या काळात प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिलात तर महाराष्ट्राचे कल्याण होईल, असे म्हणून आम्ही प्रसार माध्यमांचीही मदत घेतली. आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतले. जमीन भूसंपादनाचा नविन कायदा आपण संमत केला. त्यानंतर न भुतो न भविष्यती असा दर आम्ही दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.