मुंबईः भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाहीत. भाजप व शिवसेनेची युती घट्ट असून खासदार गजानन कीर्तिकर यांचे गैरसमज दूर केले जातील, असे स्पष्टीकरणशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी (Education Minister Deepak Kesarkar) दिले आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. केसरकर म्हणाले की, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर आम्ही चर्चेतून दूर करू. लोकसभेसाठी युतीत 2019 चाच फॉर्म्युला राहिल. अंतिम निर्णय दोन्ही नेतेच घेतील. युती मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला.
खासदार किर्तीकर यांनी काल भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. आम्ही शिंदेंसोबत 13 खासदार आलो. ‘एनडीए’ मध्ये सहभागीही झालो. पण घटक पक्षाचा दर्जा मिळाला नाही. भाजपकडून सापत्न वागणूक दिली जाते. 2019 मध्ये शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. यापुढेही त्या आम्हीच लढवणार, असे कीर्तिकर म्हणाले होते. त्यावर आज केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या घटनेत बदल करून स्वत:ला पक्षाध्यक्ष बनवून घेतले. उद्धव ठाकरे यांनी केलेले हे बदल बेकायदेशीर असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आता विधानसभा अध्यक्ष पुन्हा शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.