Agartala, Feb 06 (ANI): Bharatiya Janata Party (BJP) supporters attend the public rally addressed by Union Home Minister Amit Shah (unseen) for the upcoming Tripura Assembly elections, at Santirbazar, in Agartala on Monday. (ANI Photo)
मुंबईः केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजपने आता केजरीवालांचे जुने ट्विट्स बाहेर काढून त्यावरून केजरीवालांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. (BJP on Arvind Kejariwal) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केजरीवाल यांचे पवारांबद्धलचे जुने ट्विट शेअर केले असून त्यात त्यांनी शरद पवार यांना चक्क बेईमान असे संबोधले आहे. हे ट्विट २०१२ मधील आहे.
केजरीवाल यांनी त्यावेळी पवारांवर कठोर टीका केली होती. शरद पवार यांचे स्विस बँकेत खाते असून त्याबाबतची माहिती आम्ही जनतेसमोर आणू असा इशारा देखील केजरीवाल यांनी दिला होता. पवारांची जागा तुरुंगात आहे, अशी टीका सुद्धा केजरीवाल यांनी केली होती, याचा उल्लेख भाजपने केला आहे. केजरीवाल यांना अचानक शरद पवार प्रामाणिक वाटू लागले आहेत. ते देशातील आदरणीय नेते असल्याचा साक्षात्कार देखील केजरीवालांना आताच झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विरोध करण्यासाठी विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल आणि पवार यांची भेट असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले आहे.
दमानियांचीही टीका
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील केजरीवाल यांना यावरून लक्ष्य केले आहे. दमानिया यांनी नमूद केले की, ‘इंडिया अगेन्स्ट करपशन ‘ म्हणजेच भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी आपल्यासारख्या असंख्य लोकांनी आपले तन मन धन वाहून स्वतःला त्या आंदोलनात झोकून दिले होते. कित्येक कार्यकर्ते आपल्या भविष्याची पर्वा न करता देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा म्हणून लढले. पण, त्याच अरविंद केजरीवाल यांना शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व उद्धव ठाकरे यांच्या सारख्या लोकांबरोबर बघून तळ पायाची आग मस्तकाला गेली. अशा गलिच्छ व संधीसाधू राजकारणापासून मी दूर आहे आणि मरे पर्यंत राहीन, या शब्दात दमानियांनी संताप व्यक्त केला.