दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांचा वाद निकालात

0
84

मुंबई : दिवंगत विनोदी अभिनेते अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांवरील मालकी हक्कांबाबत कायदेशीर वाद निर्माण झाला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला असून दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांची मालकी एव्हरेस्ट प्रिंट मीडिया हाऊस या कंपनीकडे देण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने बॉम्बे फिल्म एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांना कोंडके यांच्या त्या १२ चित्रपटांवरील मालकी हक्क सोडण्याचे आदेश दिले आहे.या चित्रपटांचे संपूर्ण कॉपीराइट देखील याच कंपनीकडे असणार आहे.
दादा कोंडके यांनी २ जानेवारी १९९८ रोजी इच्छापत्र तयार केले. इच्छापत्राचे कार्यवाह म्हणून ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ स्थापन केले. दादा कोंडके यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात चित्रपटांवरील हक्क व अधिकार माणिक मोरे यांना दिल्याचे नमूद केले होते. त्यानंतर माणिक मोरे यांनी संबंधित कॉपीराईट अधिकार एव्हरेस्ट या कंपनीकडे हस्तांतरीत केले होते. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट कंपनीने १२ ऑगस्ट २०२२ रोजी माणिक मोरे यांच्याशी करार करुन संबंधित १२ चित्रपटांचे कॉपीराइट प्राप्त केले होते. त्यानंतर दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांवर एव्हरेस्ट या मीडिया कंपनीने दावा ठोकत थेट न्यायालयात धाव घेतली होती. या कंपनीला कोंडके यांच्या केवळ १२ चित्रपटांचे हक्क मिळाले असून इतर चित्रपटांचे नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या १२ चित्रपटांचे हक्क एव्हरेस्टकडे

दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, सासरचे धोतर, मुका घ्या मुका आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ यासह एकूण १२ चित्रपटांची मालकी एव्हरेस्टकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. मालकी हक्क सांगणाऱ्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानच्या हृदयनाथ कडू देशमुख आणि अभिनेत्री उषा चव्हाण या दोन विश्वस्तांना एव्हरेस्टने अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा