
मुंबई : मुंबई महापालिकेतील कोव्हीड घोटाळ्याप्रकरणी (Covid Scam in BMC) तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर (EX Mayor Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. कोव्हीडने मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅगच्या खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुंबई महापालिकेने कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा अंमलबजावणी संचलनालयाचा आरोप आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असेही ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची चौकशी निश्चित समजली जात आहे. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. संबंधित कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आले होते व त्या काळात पेडणेकर या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
