
अमरावती- अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून चाकूने वार करुन ठार करू, अशा आशयाची ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून राजापेठ पोलिसांनी तिवसा येथील विठ्ठल राव नामक व्यक्ती विरुद्ध भादंवि 504,506 (ब) कलमान्वये गुन्हा दाखल केला. यावर नवनीत राणा यांचे पती व आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत वारंवार धमकी देणं गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बाबत कल्पना दिली आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.