थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मैदानात

0
39

 

नागपूर :वीज ग्राहकांकडे बिलापोटी असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील आता मैदानात उतरले असून ग्राहकांकडे प्रत्यक्ष जाऊन थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन करताना ते दिसत आहेत.
महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक हे मागिल काही दिवसांपासून दररोज विविध भागांतील कार्यालयांना भेट देत थकबाकी वसुलीसाठी कर्मचा-यांना प्रोत्साहित करीत आहेत सोबतच तत्पर वीज जोडणी आणि इतरही तांत्रिक गोष्टींचा आढावा घेत आहेत. राजेश नाईक यांनी बुधवारी कन्हान, रामटेक, कामठी, मनसर याभागातील थकबाकीदार ग्राहकांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांना थकबाकी भरण्याचे देखील आवाहन केले. यानिमित्ताने कार्यकारी अभियंते व इतर अभियंते व कर्मचारी देखील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. ग्राहकांकडून संपुर्ण थकबाकी 31 ऑगस्टपूर्वी वसूल करण्याच्या सूचना देखील त्यांनी सर्व संबंधितांना दिल्या. उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार यांनी देखील आज उमरेड भागातील थकबाकी वसुलीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
नागपूर ग्रामिण मंडलासोबतच शहर मंडलाने देखील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली आहे. कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके यांनी आज बुधवारी गोधनी, बोकारा आणि सभोवतालच्या भागातील ग्राहकांसोबत संवाद साधून थकबाकी भरण्याचे आवाहन केले, सोबतच थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा