
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo Pass away) यांचं गुरुवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. मागील तीन वर्षांपासून त्यांना अल्झायमर हा आजार जडला होता. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेल्याच वर्षी सीमा देव याचे पती व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले आहे. सीमा आणि रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव हा देखील मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. मागील पाच ते सहा दशकांत सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका केल्या. त्यांच्या अनेक भूमिका पती रमेश देव यांच्यासोबत आहेत. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांची भूमिका गाजली.

कौटुंबिक परिस्थिती
अभिनेत्री सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ. दोघाही पतीपत्नींनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले असतानाच १ जुलै १९६३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट शेअर करुन सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्रतिभावंत अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने मन हेलावून टाकले आहे. मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या सीमा ताईंनी आपल्या प्रत्येक भूमिकेस जणू जिवंत केले. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. परमेश्वर सीमा ताईंच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, तसेच देव कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.