
मुंबई : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने (Neeraj Chopra) जागति अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships 2023) दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ही कामगिरी करतानाच नीरज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठीही पात्र ठरला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण 12 खेळाडू सहभागी होणार आहेत.
हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धा सुरु आहेत. सध्या क्वॉलिफिकेशन राउंड म्हणजेच पात्रता फेरी सुरु आहे. नीरज चोप्रा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला ॲथलिट ठरला आहे. त्यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.
अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी खेळाडूला किमान 83 मीटर अंतरावर भाला फेकावा लागतो. नीरजने पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे आता नीरज चोप्राला भारतासाठी ‘सुवर्ण कामगिरी’ करण्याची संधी आहे.