
मुंबई : राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने चिंता वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे उभे पीक करपण्याच्या मार्गावर असताना काही भागात परिस्थित अधिकच गंभीर बनली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार राज्यात पावसाची तूट ५८ टक्के असून सरासरीच्या केवळ ४२ टक्के पाऊस झाल्याची माहिती (Rain deficit in Maharashtra) आहे MARATHWADA मराठवाड्यात परिस्थिती अधिक चिंताजनक असून तेथे २८ टक्केच पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसातील तूट मोठी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात पाऊस न झाल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. विदर्भातील अमरावती (३१ टक्के तूट), अकोला (२८ टक्के तूट) आणि बुलडाणा (२० टक्के तूट आहे) या जिल्ह्यांतही पावसाने ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती आहे.
मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात ३१ टक्के, बीड जिल्ह्यात ३० टक्के, हिंगोलीत ३१ टक्के, जालना ४६ टक्के आणि परभणीत २२ टक्के पावसाची तूट आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात २१ टक्के तर नंदुरबारमध्ये २० टक्के तूट असल्याची माहिती आहे. नगर जिल्ह्यात ३२ टक्के, सांगलीत ४४ टक्के, सातारा जिल्ह्यात ३६ टक्के व सोलापूर जिल्ह्यांत २५ टक्के तूट आहे. दरम्यान, ८ ते २१ सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त होत असून त्याचा पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
