“१४ निवडणुका लढल्या, लोकांचा मूड मला कळतो..” : शरद पवार

0
41

मुंबई MUMBAI : अनेक वर्षांपासून मी राजकारणात आहे आणि सार्वजनिक जीवनात काम केले आहे. आतापर्यंत १४ निवडणुका लढविल्या असून लोकांचा मूड काय आहे, हे मला कळते. आगामी काळात जनतेला परिवर्तन हवे आहे. भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकता नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar on State Politics) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल आणि महाराष्ट्रात भाजपला लोकसभेत फारशी परिमाणकारक कामगिरी करता येणार नाही, असे सर्व्हे अलीकडे प्रसिद्ध झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पवार म्हणाले की, मला या सर्वेक्षणांबाबत कोणतीही माहिती नाही. परंतु, राज्यात बदलाचे वारे वाहत असल्याचे ते म्हणाले. मी राज्यात अनेक ठिकाणी फिरतो. सभा, कार्यक्रम किंवा संमेलनाला जातो, तेव्हा आजुबाजूच्या लोकांचे चेहरे बरेच काही सांगून जातात. मी इतक्या निवडणुका लढलो आहे. मी पहिली विधानसभा निवडणूक ५६ वर्षांपूर्वी लढलो होतो. त्यानंतर मी आजपर्यंत १४ निवडणुका लढवल्यात. त्यामुळे लोकांचा मूड मला कळतो, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, पक्ष म्हणजे केवळ आमदार नाहीत. संघटना आणि तिचे सदस्य म्हणजे पक्ष असतो. जे आमदार गेले असतील, त्यांच्यावर संघटना अवलंबून नाही. मात्र, आता कायदेशीररित्या अडचण होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर आमदार वेगळी भूमिका घेत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर पवारांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. ही काळजी करण्यासारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी तर काही ठिकाणी पिके जळून गेली आहेत. ही दुष्काळाच्या संकटाची चाहूल असून तातडीने तरतुदी करण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा