
मुंबई- NCP राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वाढल्या असून या चकमकींची पातळीही आता खालावत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापुरात अजित पवार गटाला कोल्हापुरी चपलेची आठवण करुन दिली तर त्याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. कोल्हापुरात कोल्हापुरी नव्हे तर कापशीची चप्पल प्रसिद्ध असून ती बसली की कळेल, या शब्दात मुश्रीफ यांनी पलटवार केला. (NCP Leaders Jitendra Awhad & Hasan Mushif)
कोल्हापूर येथे बोलताना आव्हाड म्हणाले होते की, गद्दारी करणारे बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी पायताणांचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यावर संतापलेल्या हसन मुश्रीफ यांनी त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे मला फार ज्युनिअर आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय जादू केली, माहिती नाही पण त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादी संपविण्याचे काम केले. अशी भाषा त्यांनी बोलायला नको होती. शिवसेनेतील बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहून आम्हालाही सत्तेत जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. तेव्हा कुठे गेला होता, त्यांचा धर्म? तेव्हा कशी सही केली होती तुम्ही? कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती बसली की कळेल, असेही ते म्हणाले.