
जळगाव Jalgaon : राज्यात पावसाने ओढ दिली असून पिके धोक्यात आली असल्याने सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करावी व उपाययोजना कराव्या, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी केली आहे. खडसे म्हणाले, यंदा सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यासह, खानदेशात व राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. प्रारंभी राज्यातील विशिष्ट भागात झालेल्या अतिवृष्टीखेरीज नंतरच्या दिवसांत पावसाने बरीच ओढ दिली. (Eknath khadse on Artificial Rain) पावसाच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गेल्यावर्षी सुरु झालेले टँकर अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरुच असून ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत व टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तविल्याने संपूर्ण राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे, असे खडसे म्हणाले.
