
बुडापेस्ट-जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत (World Athletics Championship 2023) कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. नीरजने ८८.१७ मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. २०२० साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ दोन वेळा पदके जिंकता आलेली आहेत. २००३ साली अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर गेल्यावर्षी भालाफेकपटू नीरज चोप्राने यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.