
मुंबई:रिलायन्सच्या जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली असून आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी ते लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केली. जिओ एअर फायबर फाईव्ह जी नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअर फायबरमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
विमा क्षेत्रातही

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस विमा क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. त्यामुळे आता ती एलआयसीला टक्कर देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सूत्रे नव्या पीढीकडे
दरम्यान, रिलायन्स उद्योग समूहाची सूत्रे लवकरच अंबानी कुटुंबाच्या नव्या पिढीच्या हाती सोपवली जाणार आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून राजीनामा दिला असून आता त्यांच्या जागी ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायनसच्या संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानींची संचालक मंडळावर नियुक्तीची शिफारस केली असताना नीता अंबानी आता मंडळावरून पायउतार होणार असून त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून ही घडामोड पुढे आली आहे.