
बंगळुरु Bangalore : इस्त्रोचे प्रमुख के. सोमनाथ (ISRO Chief K. Somnath) यांनी रविवारी तिरुवनंतपूरम येथे भद्रकाली देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना आपण देवळात का जातो, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. सोमनाथ म्हणाले की, मी शास्त्रज्ञ आहे आणि शोध घेणं हे माझे काम आहे. मी चंद्राचा शोध घेतो तसा अध्यात्माचाही शोध घेतो. विज्ञान असो की आध्यात्म, दोन्हींमध्ये नवनव्या गोष्टींचा शोध घेणे मला आवडते. त्यामुळे मी मंदिरांमध्येही जातो आणि धर्मग्रंथही वाचतो, असेही ते म्हणाले.
सोमनाथ म्हणाले, आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे. मंदिरे ही आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. ब्रह्मांडात नेमके काय दडले आहे, यासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहेत आणि आत्म्याला शांतात लाभावी, यासाठी मंदिरात येणे आवश्यक आहे. चांद्रयान-३ लँड झालेल्या ठिकाणाला शिवशक्ती नाव देण्यात चुकीचं काहीही नाही, शिवशक्ती आणि तिरंगा ही दोन्ही भारतीय नावे आहेत,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
