
अमरावती AMRAWATI -प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) हे आता थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत. आमदार कडू यांनी सचिन तेंडुलकरला ३० ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. ती संपल्यानंतर ते सचिन तेंडुलकरला नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरने केलेली जाहिरात हे त्यामागील कारण ठरते आहे.
आमदार कडू यांच्या सांगण्यानुसार, सचिन तेंडुलकरने त्याच्या वडिलांना पानमसाला, गुटखा व तंबाखूच्या जाहिराती न करण्याचे आश्वासन दिले होते. तेंडुलकर यानेही तसे जाहीर केले आहे. मात्र, त्याने केलेली ऑनलाईन गेमिंगची जाहिरात आमदार कडू यांना पसंत नाही. आमदार कडू म्हणाले की, भारतरत्न असणाऱ्या व्यक्तीनं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू. आम्ही त्याला ३० ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. आता ३० नंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करु. त्याला नोटीस पाठविणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.