
बीड : अजित पवार AJIT PAWAR गटाला पक्षासह चिन्हही मिळेल, असा दावा प्रफुल्ल पटेल (NCP Leader Praful Patel) यांनी केला आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मिळेल, असेही त्यांनी बीड येथे आयोजित सभेत बोलताना सांगितले. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जात आहे. प्रकरण आता निवडणूक आयोगात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
पटेल म्हणाले, लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वाना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाच चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत आहे. पण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे, असे पटेल म्हणाले.
काही लोक म्हणतात की, पक्षात फूट नाही. हेच आम्ही देखील म्हणतो की पक्षात फूट नाहीच. उलट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. आम्ही सर्वांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पटेल म्हणाले