
पुणे : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी असे शीतयुद्ध सुरु झाल्याचे दावे केले जात (Cold War between Ajit Pawar and Chandrakant Patil) आहेत. अजित पवार यांच्या कार्यशैलीने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे नाराज असून त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी बैठका घेणे अपेक्षित असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बैठकांचा धडाका लावला आहे. यात पुणे जिल्ह्यातील तब्बल ४०० कोटी रुपयांची कामे रखडल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रसार माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, पुण्यातील काही विकासकामे मंजुरीअभावी प्रलंबित आहेत. या कामांना मंजुरी मिळत नसल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेकडे केली आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. यानंतर बैठकीचे इतिवृत्त १ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र अजित पवार यांनी २ जुलैला उपमुख्यमंत्राची शपथ घेतली. यानंतर ही ४०० कोटीची कामे मंजूरी अभावी रखडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सध्या अजित पवार हेच पुण्यात येऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतात. बारामती तालुक्यातील पोलिस ठाण्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते आले नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने नेमके वास्तव स्पष्ट होऊ शकलेले नाही.