
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Subsidy increased) 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. ओणम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना हे गिफ्ट दिले असल्याचे ठाकूर यांनी ही घोषणा करताना सांगितले.
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या ११०० रुपयांच्या वर असून मोदी सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे बुधवारपासून सिलिंडर ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी २०० रुपये अनुदान होते. आता उद्यापासून त्यावर आणखी २०० रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. ३३ कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ७५ लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी ७६८० कोटी खर्च येणार आहे. उज्ज्वला सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी ३६०० रुपये खर्च करीत असून आतापर्यंत साडेनऊ लाखांवर महिलांना उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आताही यामध्ये ७५ लाख नव्या महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.