
हिंगोली : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे SHINDE GROUP शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अडचणीत आले आहेत. हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्या प्रकरणी पोलिसांनी (MLA Santosh Banger booked) आमदार बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ही घटना हिंगोलीतल कावड यात्रेच्या दरम्यानची असून बांगर यांनी हाती तलवार घेऊन ती फिरविल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
अलिकडेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंगोली जिल्ह्यात सभा झाली. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून आमदार बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. कळमनुरी येथील महादेव मंदिराजवळ आमदार बांगर यांचा सत्कार करण्यात आल्यावर बांगर यांना तलवार भेट देण्यात आली. त्यावेळी त्यांनी ती म्यानातून काढून हातात नाचवली. त्यामुळे कळमनुरी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध शस्त्रे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
