अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर घेतल्या उड्या

0
32

मुंबई : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेऊन आंदोलन केले. अचानक उद्वभवलेल्या या आंदोलनामुळे मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात अप्पर वर्धा धरण आहे. आपल्या मागण्यासाठी आंदोलन मागील तीन ते साडेतीन महिन्यांपासून मोर्शी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप समितीने केला आहे. वैतरणा धरणग्रस्तांचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक दिवसांपासून निवेदन देऊनही आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आंदोलनाची दखलच घेतली जात नसल्याने हा मार्ग पत्करावा लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकरी नियोजनबद्ध रितीने मंत्रालयात शिरले. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेतल्या व घोषणाबाजी सुरु केली. अचानक घडलेल्या या प्रकारने सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अवघ्या काही मिनिटातच आंदोलकांना जाळीवरून उतरविण्यात आले. त्यांच्यापैकी एकाला भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा