
नागपूर : गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यंदाचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ देऊन गौरविल्या जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अ.भा. अंनिसचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. संस्थेचे उपाध्यक्ष बळवंत मोरघडे आणि विश्वस्त नारायण समर्थ यांनी माहिती देताना सांगितले की, पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. १ लक्ष रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस.एन.सुब्बाराव (दिल्ली), डॉ. कुमार सप्तर्षी (पुणे), कर्मयोगी रवी कालरा (दिल्ली), डॉ. रवी आणि स्मिता कोल्हे (धारणी, मेळघाट), डॉ. अलका सरमा (गुवाहाटी), श्री. संजय नहार (सरहद, पुणे), डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख (कुरखेडा), डॉ. अशोक बेलखोडे (किनवट), डॉ. गोवर्धनलाल पाराशर (जोधपूर) यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे