
नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध कॉंग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून त्यांच्याकडून काहीच होणार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बुधवारी ते माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहे. ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १०-१२ पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्री देखील नाहीत. पंतप्रधान मोदीच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल. माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीत बोलविले नसल्याच्या प्रश्नावर श्री बावनकुळे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना बोलाविण्याचा निर्णय त्यांचा असला तरी देखील त्यांची भूमिका कधीही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला पटली नाही. कॉंग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कॉंग्रेसनेच केला होता, तेव्हाही आणि आजही त्यांची भूमिका कायम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात जो कुणी त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी येईल त्यांचे एनडीएमध्ये स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन कॉंग्रेसने तेथील जनतेला दिले आहे. ते कधीही पूर्ण करू शकणार नाही, त्यांनी कर्नाटकच्या जनतेला फसविले आहे. १० वर्षांचे बजेट जरी ५ वर्षांत खर्च केले तरी देखील ती आश्वासने पूर्ण होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.