सचिनच्या घरापुढे आंदोलन

0
52

आमदार बच्चू कडू ताब्यात

(Mumbai)मुंबई-भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. सचिन तेंडुलकर याने जाहिरात केलेल्या ऑनलाईन गेमच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Bacchu Kadu Agitation against Sachin Tendulkar). बच्चू कडू यांनी यासंदर्भात सचिन तेंडुलकरला इशारा दिला होता.

प्रहारचे कार्यकर्ते आमदार बच्चू कडू यांच्यासह गुरुवारी सकाळीच सचिनच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळा झाले. सचिनने ऑनलाईन गेमची जाहिरात करू नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात ‘बॅटिंग टू बेटिंग’, ‘चला तरुणांनो माझ्यासोबत जुगार ‘खेळा’, ‘भारतरत्न’ नाही तर मी आहे ‘जुगाररत्न’, असे बॅनर्स झळकावले. यावेळी कार्यकर्त्यांनी “देव आमचा जुगार खेळतो’, ‘परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही दिल्या. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बच्चू कडू आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि वांद्रे पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा