
-वडेट्टीवार
(Mumbai)मुंबई-इंडिया आघाडीच्या बैठकीत लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले असून आजच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Leader Of Opposition Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. आघाडीची बैठक सुरू होण्यापूर्वी वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोगोबाबत सर्व नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यानुसार निर्णय होईल. अजून लोगोवर काम बाकी आहे. त्यामुळे आज होणारे लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीयांची समिती स्थापण्यावर आज चर्चा होईल. तसेच, इंडिया आघाडीचा संयोजकाच्या नावाचीही आज घोषणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
इंडिया आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूला होईल, अशी महत्त्वाची माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार म्हणाले, आमच्या वारंवार बैठका होत आहेत. इंडिया आघाडीच्या केवळ दोन बैठका झाल्या तर केंद्र सरकारने सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त केला. आमच्या अशाच बैठका सुरू राहिल्या तर पुढील तामिळनाडूच्या बैठकीआधीही जनतेला काही गिफ्ट मिळू शकते. आमच्या अशा एक, दोन बैठका झाल्या तर पेट्रोल, डिझेलही 40 रुपयांनी स्वस्त होईल, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
